निर्देशांक उसळला   

मुंबई : अमेरिकेने भारतीय सेवा आणि उत्पादनांवरील २६ टक्के वाढीव शुल्कास ९० दिवसांसाठी म्हणजेच ९ जुलैपर्यंत स्थगित देण्यात आली असल्याची घोषणा करताच, शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी १,३१० अंकांनी वाढला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२,९०० वर बंद झाला.जागतिक बाजारातील मंदीचा कल झुगारून निर्देशांक काल १.७७ टक्के म्हणजे १,३१०.११ अंकांनी वाढून ७५,१५७.२६ वर स्थिरावला. दिवसभरात तो २.१९ टक्के म्हणजे १,६२०.१८ अंकांनी वाढून ७५,४६७.३३ वर पोहोचला होता.
 
दरम्यान, निफ्टी १.९२ म्हणजे ४२९.४० अंकांनी वाढून २२,८२८.५५ वर बंद झाला.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जगावर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादले होते. यात भारताचादेखील समावेश होता. भारतावर अमेरिकेन २६ टक्के आयात शुल्क लावले होते. ट्रम्प यांच्या आयात धोरणानंतर जगातील आघाड्याच्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धास सुरूवात झाली. त्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स तब्बल २२०० हून अधिक अंकांनी कोसळला होता. तर, निफ्टी ७०० हून अधिक अंकांनी घसरला होता. त्यामुळे गुंतवणूदारांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते.
 
दरम्यान, व्हाईट हाऊसने कार्यादेश काढत भारतावरील आयात शुल्क ९ जुलैपर्यंत ९० दिवसांसाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, लागलीच निर्देशांकात उसळी पाहायला मिळाली. काल टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी पोर्ट्सचे समभाग सर्वाधिक वाढले.

Related Articles